वारसा आणि आरसा
आमची भारत भूमी जगापेक्षा वेगळी अनं वंदनीय आहे. जगात इतर देशात प्रगती होत असेल पण माझ्या भारत मातेच्या कुशीत क्रांती होत असते. त्यांच्याकडे शास्त्रज्ञ तयार होत असतील,पण इथे माझ्या माय भूमीत विचारवंत जन्माला आले आहेत. भारत देशाच्या इतिहास जेवढा गौरवशाली आहे. तेवढा कदाचीत कुठल्या देशाला इतिहास असेल. विव्दान, महापुरूष, योध्दे, मर्यादा पुरूषोत्तम, सत्यवचनी, मग ते महिला असतील अथवा पुरूष जेवढे या देशाच्या मातीत फुलले ज्यांच्या विचारांवर शेकडो वर्षानंतरही या देशाची विचारधारा आधारलेली आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असा अभिमानास्पद इतिहास बघायला मिळणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहु महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वाल्मीक, सरदार पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर,लोकमान्य टिळक अशी कितीतरी अगणीत नावं घेता येवू शकतील ज्यांच्या पुण्याईने आज आम्ही ताठ मानेने जगतो आहोत. पण देशात ज्या पध्दतीचे राजकारण गेल्या काही वर्षांपासून सुरू झालं आहे ते असेच चालत राहीले तर अभिमानाने ताठ झालेली मान शरमेनं कधीही खाली करावी लागू शकते. देशातल्या राजकारण्यांनी आपली दुकानदारी चालावी म्हणून संत, महात्मेे, महापुरूष, सण, उत्सव,रंग सारेच वाटून घेतलेत. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळ्यांचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हरीजनांचे, महर्षी वाल्मीक कोळ्यांचे, सरदार पटेल गुजरांचे, सावरकर, टिळक ब्राह्मणांचे हा आमचा तो तुमचा म्हणत म्हणत समाजा-समाजात तेढ निर्माण करून इंग्रज गेले पण तोडा-फोडा राज्य करा ही निती भारतातल्या राज्यकर्त्यांना भेट म्हणून देवून गेलेत. हिंदु-मुस्लीम, शिख-इसाई असे धर्म आम्हीच तयार केलेत.राजकारण्यांनी सत्तेच्या मोहापायी वैमनस्य तयार करून मंदीर-मस्जिद वेगळे करत असतांनाच नैसर्गिक रंगांनाही वाटण्याचे क्रौर्य केले. हिरवा मूसलमानांचा, भगवा हिंदुंचा, निळा हरीजनांचा समाजा-समाजात या विषवल्ली पेरत असतांना नारळ कधी हिंदूंचे झाले आणि खजूर कधी मुस्लीमांचे झाले. कोणालाच कळले नाही. राम भाजपाने घेतला, छत्रपती शिवसेनेने राखला, महात्मा गांधी काँग्रेसने जोपासला, आरपीआयमध्ये कितीही गट-तट असले तरी बाबासाहेब आमचेच म्हणून या नेत्यांनी दावा केला. आज पुन्हा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आमचाच यावरून भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षात दिल्लीत रस्सीखेच सुरू झाली आहे. खरंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने भारताची राज्यघटना लिहून समस्त भारतीयांना जगण्याचा अधिकार दिला, तो महामानव कुठल्या एका समुदायाचा होवूच शकत नाही. तसा आग्रह कोणता समुदाय अथवा पक्ष करत असेल तर यामुळे बाबासाहेबांना आपण एका चौकटीत सिमीत करीत आहोत याचे भान त्यांना असायला हवे. जे बाबासाहेबांबद्दल आहे, तेच छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील सर्वांच्याच बाबतीत हे गणीत लागु पडतं ही माणसं तमाम भारतीयांसाठी आदराची आहेत. देशाची सव्वाशे कोटी जनता यांची कायम ऋणी असणार आहे. त्यामुळे शासनात असणार्या घटकांनी आपण त्या-त्या समुदायाच्या लोकांनी या महान व्यक्तींचा वारसा बनण्याचा प्रयत्न करू नये, ती लायकी आम्ही कधीच गमावून बसलो आहोत. आमच्या हातात आहे केवळ त्यांच्या विचारांवर चालून त्यांचा आरसा बनण्याची! भवानी मातेने शिवराजेंना दिलेली तलवार मिळवली म्हणून कुणी शिवाजी होणार नाही. महात्मा गांधींचा चष्मा लिलावात परत मिळवला तरी बापूंची अहिंसावृत्ती पुन्हा आली नाही. बाबासाहेबांचे लंडन मधील घर सरकारने विकत घेण्याचे ठरवले म्हणून सरकार त्यांच्या विचारांवर मंथन करते आहे, असे शक्य नाही. या सर्वांच्या वास्तु, वस्तु परत आणतांना त्यांचे विचार आत्मसात केले पाहीजेत. त्यांचा वारसा नको पण आरसा बनण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे!
No comments:
Post a Comment