टोलमुक्तीचा शुभारंभ
महाराष्ट्रात टोलनाके जेवढे गाजलेत, वादग्रस्त ठरलेत तेवढे कदाचित इतर राज्यांमध्ये झाले नसावेत. या टोल धाडीवर नको ते राजकारण खेळले गेले कधी तोडफोड कधी जाळपोळ तर कधी खळ्ळ खट्याक सुरूच असायची. महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे प्रमुख राज ठाकरे यांनी तर राज्यातील टोल बंद करण्याचे मोहिम उघडली होती. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी भेटी घेवून चर्चा केली होती. निवडणूक काळात टोल हाच प्रमुख मुद्दा मनसेसह भाजपा, शिवसेनेने उचलून धरला होता. शासनाने दलाल पोसण्यासाठी हे टोलनाके उभारल्याची टिका सर्व स्तरातून होत होती. भाजपा सत्तेवर आल्यास महाराष्ट्र टोलमुक्त करू असे आश्वासन प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील जनतेला दिले होते. सत्तेत आल्यानंतर एक वर्षाच्या काळात दुसर्यांदा टोलमुक्तीचा शुभारंभ करीत टोलमुक्त महाराष्ट्र ही घोषणा सार्थ ठरविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील सज्ज झाले आहेत. आज मध्यरात्रीपासून राज्यातील 12 टोलनाके पूर्णपणे बंद तर 53 टोलनाक्यावर कार, जीप, एस.टी., बस यांना सुट देण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील 11 टोलनाके महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील 1 टोलनाका असे 12 टोलनाक्यांचा समावेश आहे. सरकारच्या या निर्णयाचे मालवाहतूक करणार्या वाहनांकडून त्यांच्या संघटनेकडून सादर करण्यात आले आहे. कारण एकीकडे डिजल दरवाढ व दुसरीकडे जाचक टोल यामुळे दुहेरी अर्थविवंचनेत हा वर्ग फसत होता. सर्व सामान्य जनतेनेही याबाबत सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी या टोल माफीत कोल्हापूर शहर, मुंबईचे सर्व टोलनाके मुलूंड, एरोली, वाशी, दहिसर, वांद्रे-वरळी या टोलनाक्यावर टोल आकारला जाणार आहे. या सोबत मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरही टोल आकारला जाणार आहे. नवी मुंबईतील खारघर कामोठे टोलनाका बंद करावा अशी मागणी स्थानिकांसह भारतरत्न सचिन तेंडूलकर याने केली होती. सचिनने या टोलनाक्यामुळे होणार्या वाहतूक कोंडीची तक्रार अनेकवेळा राज्यसरकारकडे केली होती. सद्या स्थानिकांच्या वाहनांना या टोलमधून सुट आहे. मुख्यमंत्र्यांनी टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा अंमलात आणतांना राज्यभरातील शाळकरी विद्यार्थ्यांना पर्यायाने शाळांना मोठा दिलासा दिला आहे. शाळेची वाहने एक तारखेपासून टोलविना रस्त्यावर मार्गक्रमण करतांना दिसतील. आज मध्यरात्रीपासून बंद होणार्या टोलनाक्यांत अलिबाग -पेंण खोपोली (वडखळ), वडगाव-चाकण शिक्रापूर (शिक्रापूर), मोहोळ कुरूल -कामती-मंद्रुप, वडगाव चाकण शिक्रापूर (डोंगर), टेंभूर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-लातून (कुसळंब), नगर-करमाळा-टेंभूर्णी (अकोले खु), नाशिक-दिंडोरी-वणी-नांदुरी-सप्तश्रृंगीगड (सप्तश्रृंगी), नाशिक-दिंडोरी-वणी-नांदूरी-सप्तश्रृंगीगड (नांदुरी), नाशिक-दिंडोरी-वणी-नांदूरी-सप्तश्रृंगीगड (ढकांबे), भुसावळ -यावल-अमोदा-अमोदा-फैजपूर(तापी पुल), बुलढाणा (रावण टेकडी), चंद्रपूर (तडाली) यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment