Saturday, June 13, 2015

13 June 2015 चा दैनिक जळगाव माझामधील अग्रलेख


राजकारणातले ‘ मुन्नाभाई ’
   
दररोजच्या जगण्यात नको ती शेखी मिरविणारे भेटत असतात ज्याच्याकडे जे नाही ते दाखविण्याचा जो
प्रयत्न करतो तो कधी ना कधी तोंडघशी पडत असतो हा निसर्ग नियम आहे. एरवी विविध क्षेत्रातील ‘मुन्नाभाई’ गल्लीबोळात सापडत. पण आता देशाचे राजकारण ज्या ठिकाणाहून केंद्रीत होते त्या दिल्लीत विशेषत: राजकारणात मुन्नाभाई निष्पन्न होऊ लागल्याने येणार्‍या पिढीने काय बोध घ्यावा हा यक्षप्रश्‍न या निमित्ताने उभा राहतो. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाची सत्ता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल व उपराज्यपाल नजीब जंग यांच्यातील अजीब युध्द फार खालच्या पातळीपर्यंत गेले होते. आपण तेवढे इमानदार बाकी सारे भ्रष्ट असा भ्रम झालेले मुख्यमंत्री केजरीवाल दुसर्‍यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले तरी इगो त्यांना काम करु देत नाही. अशातच त्यांच्या पक्षातील कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांच्यावर बोगस पदवी असल्याचा ठपका ठेवत दिल्ली पोलीसांनी त्यांना तात्काळ अटक केली होती. अर्थात बोगस पदवी या प्रकरणी दिल्ली पोलीसांनी शिघ्र केलेली कारवाई हा लिखाणाचा वेगळा विषय होऊ शकतो. कारण जितेंद्रसिंह तोमर यांचे प्रकरण ताजे असतांनाच महाराष्ट्रात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावरही बोगस पदव्यांचे आरोप झाले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांची चौकशी केली जाईल असे म्हणताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोणीकरांची पाठराखण करत लोणीकरांनी योग्य तो खुलासा केलेला आहे. असे म्हणत या विषयाला पूर्णविराम देण्याचे आपले इरादे स्पष्ट केलेत. दिल्लीत भारतीय जनता पक्षाला अरविंद केजरीवाल यांनी धोबीपछाड दिली होती. देशभर सुरु असलेला भाजपाचा विजयी रथ दिल्लीत कॉमन मॅन ठरलेल्या केजरीवालांनी रोखला होता. तेव्हापासून केंद्र सरकार विरुध्द दिल्ली हा सामना रंगला होता. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल असले तरी दिल्ली पोलीस केंद्राच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर आणि महाराष्ट्रातील पाणी पुरवठा मंत्री लोणीकर या दोहांतील कारवाईत जमीन आसमानाचा फरक आहे. दोघंही मंत्री असून बोगस पदवी प्रकरणी तोमर यांना अटक होताच मंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागते. आज तर त्यांना विकामांझी भागलपूर विद्यापीठातील बोगस पदवी प्रकरणी चौकशीकामी विद्यापीठात नेत असतांना विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर अंडी व टोमॅटोचा मारा केला. तोमर यांच्यामुळे विद्यापीठाची बदनामी झाली असा आरोप करत विद्यार्थ्यांनी त्यांना मारहाण देखील केली. तोमर यांनी पोलीस तपासात आपल्याला नावाआधी अभिवक्ता लिहीण्याचे आवडायचे म्हणून हा गुन्हा केल्याचे कबूल देखील केले. मात्र महाराष्ट्रात सत्ताधारी लोणीकरांचे प्रकरण कुठे आले आणि कुठे विरले हे सत्ताधारीच सांगू शकतात. राजकारणातील या मुन्नाभाईंचे प्रकरणे ताजी असतांनाच आधीच संकटात सापडलेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची भर पडली आहे. छगन भुजबळ यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेमध्ये एल.एल.ई. ही पदवी तसेच मॅकेनिक इंजिनिअरचा डिप्लोमा केल्याची माहिती दिली असल्याचा आरोप करत प्रिती मेनन यांनी तशी तक्रार चेंबुर पोलीसात केली आहे. या सबंध प्रकरणाचे खंडन भुजबळांनी केले असले तरी या निमित्ताने राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. नरेंद्र मोदी सरकार दिल्लीत सत्ताधीश झाले. मोदींनी आपल्या पहिल्या मंत्रीमंडळाचा विस्तार करतांना मानव संसाधन हे महत्वाचे पद स्मृती इराणी यांना बहाल केले त्यावेळी स्मृती इराणी यांनी देखील दोन वेगवेगळ्या शैक्षणिक पदव्या निवडणूक काळात निवडणूक आयोगाला दिल्याचे प्रकरण समोर आले होते.

No comments:

Post a Comment