आमचे सौभाग्य म्हणायचे
राजकारणी म्हटले तर ते कुठल्याही पक्षाचे असोत सारे एकाच माळेचे मणी असतात. एकाला झाकावे अनं दुसर्याला काढावे एवढाच काय तो फरक. पक्षनिहाय प्रत्येकाची भाषा शैली, आक्रमकता, वागण्याची पध्दत बदलत असली तरी सर्वांचे ध्येय एकच आधी आपले मग मर्जीतल्या लोकांचे कल्याण. याच कारणांमुळे देश स्वतंत्र होवून इतकी वर्ष झालीत तरी त्याच समस्या, तेच प्रश्न, तेच मुद्दे पुढे येत असतात. एकच विनोद पुन्हा पुन्हा ऐकण्यात आला की ऐकणार्याला कालांतराने हसू येत नाही. असे असले तरी हुशार राजकारणी मंडळी त्याच त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी नवनवीन योजना मांडून, आपल्या संभाषण चातूर्याच्या कलेवर मतदारांना मुर्ख बनवतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी, सरकार, बदलले तरी समस्या अजून कायम आहेत. आणि यापुढेही राहतील हे छातीठोकपणे सांगता येते. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्र्यांशी असलेल्या ‘सुसंवादातून’ वेळ काढला हे आम्हा जळगाव जिल्हा वासियांचे खरेतर भाग्य म्हणायचे. राज्याचे महसूल मंत्री ना.एकनाथराव खडसे सरकार स्थापनेवेळी स्वयंभू मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून शड्डू ठोकून आखाड्यात उतरले होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या सत्तेवर प्रथमच मुख्यमंत्री विराजमान होणार म्हटल्यावर संघाचा शब्द प्रमाण राहील. हे अधोरेखित असतांना खडसेंचा टिकाव लागणार नाही. हेही तेवढेच खरे होते. तरीही नाथाभाऊंची राजकीय शक्ती बघता त्यांना मुख्यमंत्र्यांचा खालोखाल असलेले महसूल खाते देण्यात आले. यासोबतच किमान अर्धा डझन खात्यांची जबाबदारी पर्यायाने नाथाभाऊंना आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत याचा विसर पडणे समजण्यासारखे आहे. या कामाच्या व्यस्ततेतून त्यांना पुन्हा जिल्ह्याची आठवण झाली. जळगाव जिल्हा औद्योगिकदृष्टया पिछाडीवर आहे. याचाही भाऊंना साक्षात्कार झाला. म्हणून जळगाव जिल्ह्याच्या ओैद्योगिक विकासासाठी कोट्यावधी रूपये नाथाभाऊंनी आणल्याचे जाहीर केले आहे. यात जिल्ह्यातील चाळीसगाव येथे दोन औद्योगिक प्रकल्प, भुसावळला टेक्सटाईल्स पाकर्र् तसेच बर्हाणपूर -अंकलेश्वर-इंदूर-औरंगाबाद या दोन राज्यमार्गाना राष्ट्रीय महामार्ग म्हणून केंद्राने मंजूरी दिल्याचे महसूल मंत्र्यानी सांगितले. जिल्ह्यातील विविध रस्त्यासाठी 52.53 कोटी रूपयांचा निधी देखील केंद्राकडून मंजूर झाला आहे. चाळीसगाव औद्योगिक वसाहतीत उभे राहणारे दोन प्रकल्प उभे राहील्यास दोन हजार तरूणांना रोजगार मिळणार असल्याचे भाकीत नाथाभाऊंनी केले. याचा अर्थ मंत्री महोदयांना बेरोजगारी या गंभीर प्रश्नाची देखील जाण आहे. जळगाव जिल्ह्याचा भौगोलिक अभ्यास करता जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात नोकरीच्या निमित्ताने जाणार्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. यापेक्षा ज्यांना दररोज पोटाची खळगी भरण्याची चिंता सतावते. या चिंतेचे शमन करण्यासाठी जिल्ह्याबाहेर भटकंती करावी लागते. रोजगारासाठी आपले गाव, तालुका, जिल्हा सोडण्याची वेळ ज्यांच्यावर येते. ती नेमकी कोणामुळे आली राजकारण्यांच्या उदासिनतेमुळे ? याचा विचार केला पाहिजे. परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्या मतदार संघातील कोणता माणूस, कोणती स्त्री, कुठल्या गावी गेली आहे. याची इत्तमभूत माहिती राजकारण्यांना असते. निवडणुका लागल्या की मतदार यादीतून या लोकांची छाटणी करून त्यांच्याशी संपर्क केला जातो. मतदानाच्या दिवशी वेळप्रसंगी त्यांना घ्यायला खासगी वाहनांची व्यवस्था केली जाते. भोळा मतदार कुठलाही प्रश्न न विचारता गाडीत बसून येतो. प्रामाणिकपणे मतदान करून निघून जातो. मात्र याच राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे मला माझे गाव, नातेवाईक, सोडावे लागले हा विचार ज्या दिवशी मनात येईल. या प्रश्नाचा ज्या दिवशी मतदार राजकारण्यांना जाब विचारेल तो खरा सौभाग्याचा दिन.
No comments:
Post a Comment