Friday, July 17, 2015
Thursday, July 16, 2015
Wednesday, July 15, 2015
Tuesday, July 14, 2015
Monday, July 13, 2015
Sunday, July 12, 2015
Friday, June 19, 2015
19 June 2015 चा दैनिक जळगाव माझामधील अग्रलेख
जळगाव नगरी महाराष्ट्रात सुवर्ण नगरी म्हणून सर्वदूर सुपरिचित आहे. जळगावला सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, राजकीय वारसा असतांना शहराला वेळोवेळी लाभलेले पोलीस अधिकारी जळगाव शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात यशस्वी ठरले आहेत. एव्हाणा काही अधिकार्यांनी कर्तव्य बजावतांना दाखवलेली दबंगगिरी आजही जिल्हा वासियांच्या स्मरणात आहे. पण जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षकपदी डॉ.जालिंदर सुपेकर आले आणि पोलीसांच्या नावाला जणू ग्रहणचं लागले. यात कदाचित डॉ.सुपेकर यांचा साधेपणा नडत असावा. किंवा सुपेकर पोलीसांवर पोलीसींग करण्यात कमी पडत असावेत. पोलीस अधिक्षक कार्यरत असलेल्या जळगाव शहराची दशा अत्यंत बिकट झालेली आहे. महिलांचे सार्वजनिक ठिकाणी फिरणे असुरक्षित वाटू लागले आहे. सौभाग्याचे व मांगल्याचे प्रतिक म्हटलेले मगळसुत्र गळ्यातून काढून घरातील खुंटीवर टांगण्याची वेळ आली आहे. एवढ्या मंगळसुत्र चोरीच्या घटना दिवसाढवळ्या घडू लागल्या आहेत. शहरात बलात्कार, खून, दरोडे, तरूणींची छेडखानी हे अनुचित प्रकार सर्रास घडू लागले आहेत. काल दिवसा ढवळ्या रिंधुरवाडा या शनिपेठ पोलीस हद्दीत अज्ञात दरोडेखोरांनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून 50 लाख रूपयांचे सोने लुटले. बंगाली कारागिरांना या अज्ञात चोरांनी ज्या पध्दतीने बांधून खोलीत कोंडून सोने घेवून पोबारा केला. हा तपासाचा भाग असला तरी जिल्ह्यातील पोलीसांचा धाक संपला असल्याचे प्रतिक आहे. आज पुन्हा जिल्ह्यातील चोपडा शहरात जे.डी.सी.सी. बँक शाखा चुंचाळेच्या व्यवस्थापकाकडून 10 लाख रूपये अज्ञात चोरट्यांनी पळविले. चोपड्यात ही तिसरी घटना असून आतापर्यंत 22.50 लाख रूपये याच पध्दतीने लांबविण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्याला पोलीस अधिकार्यांची वेगळी अशी ओळख राहीलेली आहे. यात स्व.दिपक जोग त्यांच्यापासून वसंत कोरेगावकर, संतोषकुमार रस्तोगी प्रविण सांळुखे, धनंजय कुठकर्णी, एस.जयकुमार, इशु सिंधू, दिलीप सावंत आदींनी जिल्हा गाजवला आहे. काहीसे वादग्रस्त असले तरी डि.वाय.एस.पी.दिलीप शंकरवार, वाय.डी. पाटील, संजय पाटील आदींनीही गुन्हेगारांवर वचक ठेवला होता. आज जळगाव पोलीसांची खाकी बदनाम होवू पाहते आहे. जिल्हा पोलीस दलात नुकतेच मोठे फेरबदल (बदल्या) झाल्या. या बदल्या कागदावर शासकीय पातळीवर दाखविण्यात येत असल्या तरी बदल्यांमागे घडलेले राजकारण सर्वश्रृत आहे. आता सत्तेत असतांना आणि पूर्वी सत्तेत नसतांना जिल्ह्यात कोणता पोलीस अधिकारी कुठे जाईल हे कोणता नेता ठरवतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या राजकारणामुळे हाजी हाजी करणारे अधिकारी जिल्ह्याच्या माथी मारण्यात येत आहे. आजच्या तारखेला जळगाव जिल्ह्यात एकही डॅशिंग पोलीस अधिकारी कर्तव्यास हजर नाही. अनेकांनी जिल्ह्यात येण्याची इच्छा व्यक्त केली असतांना संबधित नेत्याच्या घरी खेटे घातले पण नाथ कुणालाच पावला नाही. जळगाव जिल्हा पोलीसात स्थानिक गुन्हे शाखा हे एकमेव डिपार्टमेंट तग धरून आहे. एलसीबीच्या ऑक्सिजनवर जिल्हा पोलीस किती दिवस जगणार आहे. एलसीबी सुध्दा काही प्रमाणात वादाच्या भोवर्यात सापडू लागली आहे. जिल्ह्यात कदाचित आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा होवू शकतो. राज्याचे गृहखाते मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडेच राखून ठेवले आहे. मुख्यमंत्र्याच्या अधिपथ्याखाली असलेल्या गृहखात्याची अब्रू जळगाव जिल्ह्यात वेशीवर टांगली जात आहे. जिल्ह्यातले राजकारण त्यात जिल्हा पोलीसात आपसात सुरू असलेले राजकारण या दोन्हींचा फटका जिल्ह्यातील सामान्य जनतेला बसत असून सुपेकर साहेब हे काय चाललंय असा सवाल मुख्यमंत्री आज आल्यास त्यांनी विचारला पाहिजे.
Tuesday, June 16, 2015
16 June 2015 चा दैनिक जळगाव माझामधील अग्रलेख
आमचे सौभाग्य म्हणायचे
राजकारणी म्हटले तर ते कुठल्याही पक्षाचे असोत सारे एकाच माळेचे मणी असतात. एकाला झाकावे अनं दुसर्याला काढावे एवढाच काय तो फरक. पक्षनिहाय प्रत्येकाची भाषा शैली, आक्रमकता, वागण्याची पध्दत बदलत असली तरी सर्वांचे ध्येय एकच आधी आपले मग मर्जीतल्या लोकांचे कल्याण. याच कारणांमुळे देश स्वतंत्र होवून इतकी वर्ष झालीत तरी त्याच समस्या, तेच प्रश्न, तेच मुद्दे पुढे येत असतात. एकच विनोद पुन्हा पुन्हा ऐकण्यात आला की ऐकणार्याला कालांतराने हसू येत नाही. असे असले तरी हुशार राजकारणी मंडळी त्याच त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी नवनवीन योजना मांडून, आपल्या संभाषण चातूर्याच्या कलेवर मतदारांना मुर्ख बनवतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी, सरकार, बदलले तरी समस्या अजून कायम आहेत. आणि यापुढेही राहतील हे छातीठोकपणे सांगता येते. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्र्यांशी असलेल्या ‘सुसंवादातून’ वेळ काढला हे आम्हा जळगाव जिल्हा वासियांचे खरेतर भाग्य म्हणायचे. राज्याचे महसूल मंत्री ना.एकनाथराव खडसे सरकार स्थापनेवेळी स्वयंभू मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून शड्डू ठोकून आखाड्यात उतरले होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या सत्तेवर प्रथमच मुख्यमंत्री विराजमान होणार म्हटल्यावर संघाचा शब्द प्रमाण राहील. हे अधोरेखित असतांना खडसेंचा टिकाव लागणार नाही. हेही तेवढेच खरे होते. तरीही नाथाभाऊंची राजकीय शक्ती बघता त्यांना मुख्यमंत्र्यांचा खालोखाल असलेले महसूल खाते देण्यात आले. यासोबतच किमान अर्धा डझन खात्यांची जबाबदारी पर्यायाने नाथाभाऊंना आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत याचा विसर पडणे समजण्यासारखे आहे. या कामाच्या व्यस्ततेतून त्यांना पुन्हा जिल्ह्याची आठवण झाली. जळगाव जिल्हा औद्योगिकदृष्टया पिछाडीवर आहे. याचाही भाऊंना साक्षात्कार झाला. म्हणून जळगाव जिल्ह्याच्या ओैद्योगिक विकासासाठी कोट्यावधी रूपये नाथाभाऊंनी आणल्याचे जाहीर केले आहे. यात जिल्ह्यातील चाळीसगाव येथे दोन औद्योगिक प्रकल्प, भुसावळला टेक्सटाईल्स पाकर्र् तसेच बर्हाणपूर -अंकलेश्वर-इंदूर-औरंगाबाद या दोन राज्यमार्गाना राष्ट्रीय महामार्ग म्हणून केंद्राने मंजूरी दिल्याचे महसूल मंत्र्यानी सांगितले. जिल्ह्यातील विविध रस्त्यासाठी 52.53 कोटी रूपयांचा निधी देखील केंद्राकडून मंजूर झाला आहे. चाळीसगाव औद्योगिक वसाहतीत उभे राहणारे दोन प्रकल्प उभे राहील्यास दोन हजार तरूणांना रोजगार मिळणार असल्याचे भाकीत नाथाभाऊंनी केले. याचा अर्थ मंत्री महोदयांना बेरोजगारी या गंभीर प्रश्नाची देखील जाण आहे. जळगाव जिल्ह्याचा भौगोलिक अभ्यास करता जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात नोकरीच्या निमित्ताने जाणार्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. यापेक्षा ज्यांना दररोज पोटाची खळगी भरण्याची चिंता सतावते. या चिंतेचे शमन करण्यासाठी जिल्ह्याबाहेर भटकंती करावी लागते. रोजगारासाठी आपले गाव, तालुका, जिल्हा सोडण्याची वेळ ज्यांच्यावर येते. ती नेमकी कोणामुळे आली राजकारण्यांच्या उदासिनतेमुळे ? याचा विचार केला पाहिजे. परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्या मतदार संघातील कोणता माणूस, कोणती स्त्री, कुठल्या गावी गेली आहे. याची इत्तमभूत माहिती राजकारण्यांना असते. निवडणुका लागल्या की मतदार यादीतून या लोकांची छाटणी करून त्यांच्याशी संपर्क केला जातो. मतदानाच्या दिवशी वेळप्रसंगी त्यांना घ्यायला खासगी वाहनांची व्यवस्था केली जाते. भोळा मतदार कुठलाही प्रश्न न विचारता गाडीत बसून येतो. प्रामाणिकपणे मतदान करून निघून जातो. मात्र याच राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे मला माझे गाव, नातेवाईक, सोडावे लागले हा विचार ज्या दिवशी मनात येईल. या प्रश्नाचा ज्या दिवशी मतदार राजकारण्यांना जाब विचारेल तो खरा सौभाग्याचा दिन.
Monday, June 15, 2015
15 June 2015 चा दैनिक जळगाव माझामधील अग्रलेख
Sunday, June 14, 2015
14 June 2015 चा दैनिक जळगाव माझामधील अग्रलेख
जगायची नाही तरी ...
देशाचा नको पण तात्पुरता महाराष्ट्राचा विचार केला तरी न्यूज चॅनल बघून, वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्या वाचून चक्रावल्या सारखे होते. श्रीमंत अधिक श्रीमंत होताहेत यात कसलाही वाद नसतांना घोटाळेबाज जास्त घोटाळे करू लागलेत. या वाक्याची पुन्हा भर पडली आहे. याआधी सत्त्तेत असणारे आघाडी सरकार घोटाळेबाज सरकार म्हणून नावारूपाला आल्याने त्यांचे पतन झाले होते. आणि संयम, विचारशील, कर्तव्यदक्ष असा निवडणुकीपुरता चेहरा बनविणार्या भारतीय जनता पार्टीला जनतेने औक्षण करून सिंहासनावर बसविले. सहा सात महिन्यातच या सत्तारूढ युती सरकारचा व सत्तेतून पाय उतार झालेल्या आघाडीच्या नेत्यांचा खेळ लक्षात येवू लागला आहे.
“आम्ही मारल्यासारखे करू तुम्ही रडण्यासारखे करायचे” हा प्रयोग मुंबई दरबारी सुरू आहे. राज्यातला प्रेक्षक हा खेळ पाहून कंटाळतील म्हणून कधीतरी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस -महसुल मंत्री ना.एकनाथराव खडसे यांची जुगलबंदी सुरू ठेवली जाते. जनता पुन्हा आपल्या सोयी सुविधांसाठी आवाज उठवायला लागली की, भाजपा-विरूध्द शिवसेना असा ‘खास खेळ’ आयोजीत केला जातो. मध्यमवर्गीय, पिडीत कॉमनमॅन असेल शासनाच्या योजनापासून वंचित असेल त्याने आपला हक्क मागता कामा नयेे याची पुरेपुर खबरदारी शासन घेत असते. चालायला रस्ते नाहीत, प्यायला पुरेसे पाणी नाही, पाण्याअभावी शेतीचे आधीच बारा वाजलेले रेशनचे धान्य स्वस्त केले हे खरे असले तरी रेशन माफीयांचे अद्याप पोट भरलेले नाही. त्यामुळे लाभार्थी रांगेतच दिसतो. पंतप्रधानांनी बँकेत खाते उघडायला लावले. पण त्या खात्यात ठणठणाट असल्याने खाते उघडले हे सांगायची देखील लाज वाटते. नरेगा, मनरेगा, रोहयो या शासनाच्या योजना ठेकेदार पोसण्यासाठी असतात. हे आता शासनाने जाहीर करण्याचे तेवढे बाकी आहे. इथं एक बायको पोसण्यासाठी आयुष्यभर मर-मर मरावे लागते. आणि जनतेच्या दुधावरचे ‘लोणी’ खाणारे मंत्री दोन दोन बायका पोसतात. गरीबांच्या मुलांना दुषीत पाण्यापासून का असेना बनविलेली. पेप्सी खायला पैसे देतांना खिशाचा विचार करावा लागतो. दुसरीकडे शहरात श्रीमंताची बिघडलेली पोरं पब, डिस्कोत थिरकतात कधी रेव्ह पार्टी कधी हुक्का पार्टी गाजवितात असल्या पार्ट्या आता जळगावातही होवू लागल्यात हा भाग वेगळा. देशाला स्वातंत्र्य मिळवून इतकी वर्षे झालीत तरी आम्ही निवडून दिलेले हेच ते ‘योग्य सरकार’ अशी म्हणण्याची सत्सत् विवेक बुध्दी जागृत करण्यास कुठलाही पक्ष पात्र ठरलेला नसताना पद्म, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न कोणाला द्यावे या विवंचनेत सरकार असते. न्यायप्रविष्ठ खटले निकाली काढण्यासाठी लोक अदालती भरवाव्या लागतात. लाच देणे आणि घेणे दोनही कायद्याने गुन्हा आहे. असे फलक प्रत्येक कार्यालयात लावल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक खात्याची निर्मिती करावी लागते. दररोज ट्रॅप होत असतांना नवीन लाचखोर तयार होत असतात. रोजगार निर्मितीची घोषणा ज्या शहरात होते. त्याच परिसरात व्यावसायीकांच्या मानगुटीवर ‘मॉल संस्कृती’चे भूत येवून बसते. शेतकर्यांच्या कष्टकर्यांच्या आत्महत्या थांबयला तयार नाहीत. शासनाकडून आर्थिक मदत मिळवायची असेल तर आधी तुम्हाला मरावे लागेल. त्यानंतरच वारसांना मदत दयायची की नाही याचा विचार सरकार करते. स्वच्छ भारत अभियान राबवितांना त्याचाच भाग म्हणून गाव पातळीवर चकाचक सुलभ शौचालय उभारतांना कोट्यावधी रूपये त्याच्यावर खर्च होतात. इकडे जनतेच्या पोटात अन्न नाही. भूकेल्यांच्या यादीत भारताचा प्रथम क्रमांक लागतो. असा निष्कर्ष एका अहवालाद्बारे काढण्यात आला आहे. याचा पाठपुरावा करायला सरकारला वेळ नाही. गावागावात उभारले गेलेले सुलभ शौचालय बघता सरकारने जगायची नाही पण हागायची सोय केली हे काय कमी महत्वाचे आहे. असेच म्हणावे लागेल.
Saturday, June 13, 2015
13 June 2015 चा दैनिक जळगाव माझामधील अग्रलेख
राजकारणातले ‘ मुन्नाभाई ’
Sunday, June 7, 2015
अफजलखानाचा पुतळा उभारायचा का ?
महाराष्ट्राच्या भूमीत आपले राजकीय जाळे पसरवण्यात बर्यापैकी यशस्वी झाल्याने एमआयएम पक्षाने आपली जात दाखवायला प्रारंभ केला आहे. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतळे उभारण्यास एमआयएम पक्षाचे औरंगाबद येथील आ. इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. इथवरच एमआयएमचा हिरवा विचार थांबला नसून तमाम हिंदूंचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात होणारे स्मारक यालाही जलील यांनी विरोध दर्शवला असून यासाठी वेळ पडल्यास न्यायालयात जाण्याचाही इशारा दिलेला आहे. त्यामुळे शिवछत्रपींचा नको मग काय अफजलखानाचा पुतळा उभारायचा का? असा संतप्त सवाल महाराष्ट्रातील मराठी मनात खल करु लागला आहे. एमआयएमने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास विरोध करण्यासाठी आपली जिव्हा टाळूला लावावी तीही शिवराज्याभिषेकदिनी याला काय म्हणावे? किती यांचे लाड पुरवायचे. केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आहे की, एमआयएमचे हे आता सत्ताधार्यांनी स्पष्ट करायला हवे. अकबरुद्दीन व असदुद्दीन ओवेसी या द्वयींचा असलेला एमआयएम पक्ष संविधानाच्या विरोधी विचार सरणीचा आहे हे वेळोवेळी या दोघं बंधुंच्या विखारी बोलण्याने जगासमोर आलेलेच आहे. आ. प्रणिती शिंदे या एकट्या रणरागीणीने या पक्षावर ओवेसी बंधुंवर शरसंधान साधत हा पक्ष सिमी विचार सरणीचा असून त्याच्यावर बंदी आणा असा घणाघात कधीच केला आहे. हा आरोप जिव्हारी लागल्याने एमआयएमने त्यांना नोटीस देखील पाठवली होती. एमआयएम पक्षाने अल्पसंख्यांक व दलित व्होट बँक काबीज करुन महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश मिळविला आहे. एमआयएम पक्ष राज्यात वाढीस लागणे महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी घातक असल्याचे सर्वच बोलत असतात. मग पक्षाला मिळालेला मतांचा आकडा आला कोठून? महाराष्ट्रातील मुस्लिम समाज त्यातल्या त्यात तरुण या पक्षाकडे आकर्षिला जात आहे. ग्रामीण भागापर्यंत ओवेसी बंधुंचे बॅनर, पोस्टर्स झळकू लागले आहेत. म्हणजेच याच मातीतून एमआयएमला खतपाणी मिळते आहे. एरवी अकबरुद्दीन ओवेसी हिंदूंवर आक्षेपार्ह दर्पोक्ती करायचा आज त्या पक्षाच्या आमदाराने स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबद्दल जाहीरपणे विरोध करणे म्हणजे आम्ही आमची जागा तपासून बघण्याची वेळ आली आहे असे समजावे. एकीकडे किल्ले रायगडावर राजेशाही थाटात महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा होतोय देशभरातून त्यांचे मावळे गडावर पोहोचलेत याच शिवछत्रपतींनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध केला. दुश्मनाचा खातमा झाला दुश्मनी संपली म्हणून मेलेल्या अफजलखानाचे मुस्लिम धर्माच्या रिवाजानुसार किल्ले रायगडावर थडगे बांधले. ज्या राजा विषयी बोलतांना औरंगजेब विचार करुन बोलतांना. महती सांगताना स्वतःला आवर घालू शकला नव्हता. ‘दोस्त हो शिवबा जैसा और दुश्मन भी हो तो शिवाजी जैसा’ असे म्हणत औरंगाजेबाने गौरोद्गार काढले होते. त्या हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक राजा विषयी मत मांडण्याची लायकी या इम्तियाज जलील याचीच काय पण एमआयएम पक्षाची नाही! राज्याचे महसूल मंत्री एकनाथराव खडसेंनी स्वतंत्र उर्दू शाळा असतांना मराठी शाळेत उर्दू घुसवायची. पंतप्रधानांनी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी तैय्यार असल्याची ग्वाही द्यायची राममंदीर मुद्द्याला बगल द्यायची मग शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध होणारच आहे. आता यापुढे अफजलखानाचे, औरंगजेबांचे पुतळे उभारले गेले आश्चर्य वाटायला नको!
Monday, June 1, 2015
1 June 2015 चा दैनिक जळगाव माझामधील अग्रलेख
वारसा आणि आरसा
आमची भारत भूमी जगापेक्षा वेगळी अनं वंदनीय आहे. जगात इतर देशात प्रगती होत असेल पण माझ्या भारत मातेच्या कुशीत क्रांती होत असते. त्यांच्याकडे शास्त्रज्ञ तयार होत असतील,पण इथे माझ्या माय भूमीत विचारवंत जन्माला आले आहेत. भारत देशाच्या इतिहास जेवढा गौरवशाली आहे. तेवढा कदाचीत कुठल्या देशाला इतिहास असेल. विव्दान, महापुरूष, योध्दे, मर्यादा पुरूषोत्तम, सत्यवचनी, मग ते महिला असतील अथवा पुरूष जेवढे या देशाच्या मातीत फुलले ज्यांच्या विचारांवर शेकडो वर्षानंतरही या देशाची विचारधारा आधारलेली आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असा अभिमानास्पद इतिहास बघायला मिळणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहु महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वाल्मीक, सरदार पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर,लोकमान्य टिळक अशी कितीतरी अगणीत नावं घेता येवू शकतील ज्यांच्या पुण्याईने आज आम्ही ताठ मानेने जगतो आहोत. पण देशात ज्या पध्दतीचे राजकारण गेल्या काही वर्षांपासून सुरू झालं आहे ते असेच चालत राहीले तर अभिमानाने ताठ झालेली मान शरमेनं कधीही खाली करावी लागू शकते. देशातल्या राजकारण्यांनी आपली दुकानदारी चालावी म्हणून संत, महात्मेे, महापुरूष, सण, उत्सव,रंग सारेच वाटून घेतलेत. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळ्यांचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हरीजनांचे, महर्षी वाल्मीक कोळ्यांचे, सरदार पटेल गुजरांचे, सावरकर, टिळक ब्राह्मणांचे हा आमचा तो तुमचा म्हणत म्हणत समाजा-समाजात तेढ निर्माण करून इंग्रज गेले पण तोडा-फोडा राज्य करा ही निती भारतातल्या राज्यकर्त्यांना भेट म्हणून देवून गेलेत. हिंदु-मुस्लीम, शिख-इसाई असे धर्म आम्हीच तयार केलेत.राजकारण्यांनी सत्तेच्या मोहापायी वैमनस्य तयार करून मंदीर-मस्जिद वेगळे करत असतांनाच नैसर्गिक रंगांनाही वाटण्याचे क्रौर्य केले. हिरवा मूसलमानांचा, भगवा हिंदुंचा, निळा हरीजनांचा समाजा-समाजात या विषवल्ली पेरत असतांना नारळ कधी हिंदूंचे झाले आणि खजूर कधी मुस्लीमांचे झाले. कोणालाच कळले नाही. राम भाजपाने घेतला, छत्रपती शिवसेनेने राखला, महात्मा गांधी काँग्रेसने जोपासला, आरपीआयमध्ये कितीही गट-तट असले तरी बाबासाहेब आमचेच म्हणून या नेत्यांनी दावा केला. आज पुन्हा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आमचाच यावरून भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षात दिल्लीत रस्सीखेच सुरू झाली आहे. खरंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने भारताची राज्यघटना लिहून समस्त भारतीयांना जगण्याचा अधिकार दिला, तो महामानव कुठल्या एका समुदायाचा होवूच शकत नाही. तसा आग्रह कोणता समुदाय अथवा पक्ष करत असेल तर यामुळे बाबासाहेबांना आपण एका चौकटीत सिमीत करीत आहोत याचे भान त्यांना असायला हवे. जे बाबासाहेबांबद्दल आहे, तेच छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील सर्वांच्याच बाबतीत हे गणीत लागु पडतं ही माणसं तमाम भारतीयांसाठी आदराची आहेत. देशाची सव्वाशे कोटी जनता यांची कायम ऋणी असणार आहे. त्यामुळे शासनात असणार्या घटकांनी आपण त्या-त्या समुदायाच्या लोकांनी या महान व्यक्तींचा वारसा बनण्याचा प्रयत्न करू नये, ती लायकी आम्ही कधीच गमावून बसलो आहोत. आमच्या हातात आहे केवळ त्यांच्या विचारांवर चालून त्यांचा आरसा बनण्याची! भवानी मातेने शिवराजेंना दिलेली तलवार मिळवली म्हणून कुणी शिवाजी होणार नाही. महात्मा गांधींचा चष्मा लिलावात परत मिळवला तरी बापूंची अहिंसावृत्ती पुन्हा आली नाही. बाबासाहेबांचे लंडन मधील घर सरकारने विकत घेण्याचे ठरवले म्हणून सरकार त्यांच्या विचारांवर मंथन करते आहे, असे शक्य नाही. या सर्वांच्या वास्तु, वस्तु परत आणतांना त्यांचे विचार आत्मसात केले पाहीजेत. त्यांचा वारसा नको पण आरसा बनण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे!
Sunday, May 31, 2015
31 मे 2015 चा दैनिक जळगाव माझामधील अग्रलेख
टोलमुक्तीचा शुभारंभ
महाराष्ट्रात टोलनाके जेवढे गाजलेत, वादग्रस्त ठरलेत तेवढे कदाचित इतर राज्यांमध्ये झाले नसावेत. या टोल धाडीवर नको ते राजकारण खेळले गेले कधी तोडफोड कधी जाळपोळ तर कधी खळ्ळ खट्याक सुरूच असायची. महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे प्रमुख राज ठाकरे यांनी तर राज्यातील टोल बंद करण्याचे मोहिम उघडली होती. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी भेटी घेवून चर्चा केली होती. निवडणूक काळात टोल हाच प्रमुख मुद्दा मनसेसह भाजपा, शिवसेनेने उचलून धरला होता. शासनाने दलाल पोसण्यासाठी हे टोलनाके उभारल्याची टिका सर्व स्तरातून होत होती. भाजपा सत्तेवर आल्यास महाराष्ट्र टोलमुक्त करू असे आश्वासन प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील जनतेला दिले होते. सत्तेत आल्यानंतर एक वर्षाच्या काळात दुसर्यांदा टोलमुक्तीचा शुभारंभ करीत टोलमुक्त महाराष्ट्र ही घोषणा सार्थ ठरविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील सज्ज झाले आहेत. आज मध्यरात्रीपासून राज्यातील 12 टोलनाके पूर्णपणे बंद तर 53 टोलनाक्यावर कार, जीप, एस.टी., बस यांना सुट देण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील 11 टोलनाके महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील 1 टोलनाका असे 12 टोलनाक्यांचा समावेश आहे. सरकारच्या या निर्णयाचे मालवाहतूक करणार्या वाहनांकडून त्यांच्या संघटनेकडून सादर करण्यात आले आहे. कारण एकीकडे डिजल दरवाढ व दुसरीकडे जाचक टोल यामुळे दुहेरी अर्थविवंचनेत हा वर्ग फसत होता. सर्व सामान्य जनतेनेही याबाबत सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी या टोल माफीत कोल्हापूर शहर, मुंबईचे सर्व टोलनाके मुलूंड, एरोली, वाशी, दहिसर, वांद्रे-वरळी या टोलनाक्यावर टोल आकारला जाणार आहे. या सोबत मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरही टोल आकारला जाणार आहे. नवी मुंबईतील खारघर कामोठे टोलनाका बंद करावा अशी मागणी स्थानिकांसह भारतरत्न सचिन तेंडूलकर याने केली होती. सचिनने या टोलनाक्यामुळे होणार्या वाहतूक कोंडीची तक्रार अनेकवेळा राज्यसरकारकडे केली होती. सद्या स्थानिकांच्या वाहनांना या टोलमधून सुट आहे. मुख्यमंत्र्यांनी टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा अंमलात आणतांना राज्यभरातील शाळकरी विद्यार्थ्यांना पर्यायाने शाळांना मोठा दिलासा दिला आहे. शाळेची वाहने एक तारखेपासून टोलविना रस्त्यावर मार्गक्रमण करतांना दिसतील. आज मध्यरात्रीपासून बंद होणार्या टोलनाक्यांत अलिबाग -पेंण खोपोली (वडखळ), वडगाव-चाकण शिक्रापूर (शिक्रापूर), मोहोळ कुरूल -कामती-मंद्रुप, वडगाव चाकण शिक्रापूर (डोंगर), टेंभूर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-लातून (कुसळंब), नगर-करमाळा-टेंभूर्णी (अकोले खु), नाशिक-दिंडोरी-वणी-नांदुरी-सप्तश्रृंगीगड (सप्तश्रृंगी), नाशिक-दिंडोरी-वणी-नांदूरी-सप्तश्रृंगीगड (नांदुरी), नाशिक-दिंडोरी-वणी-नांदूरी-सप्तश्रृंगीगड (ढकांबे), भुसावळ -यावल-अमोदा-अमोदा-फैजपूर(तापी पुल), बुलढाणा (रावण टेकडी), चंद्रपूर (तडाली) यांचा समावेश आहे.
Subscribe to:
Posts (Atom)